Sunday, June 5, 2016

कौमार्य परीक्षा कुणासाठी? कशासाठी?

नाशिकमधल्या एका गंभीर घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. कंजारभाट जातपंचायतीने नुकतंच लग्न झालेल्या तरुणीची कौमार्याची परीक्षा घेतल्याची धक्कादायक घटना घडलीये. शिर्डीमधल्या एका मुलीचा नाशिकमधल्या मुलाशी विवाह झाला. मात्र, लग्नानंतर लगेचच नवरीच्या कौमार्याची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये ही मुलगी नापास झाल्याचा दावा जातपंचायतीनं केला.त्यानंतर नवरीला लग्नघरीच सोडून वर्‍हाडी निघून गेले. नवर्‍या मुलानेही जातपंचायतीच्या सांगण्यावरून लग्नही मोडलं. विशेष म्हणजे या मुलीनं पोलीस भरतीसाठी ती प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती ट्रेनिंगही घेत होती. मुलीनं स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न केला. पण कोणीही तिचं ऐकलं नाही.कौमार्य परीक्षा प्रकरणी संबंधित नवर्‍यामुलाने पीडित मुलीची माफी मागितल्यानंतर वधू-वराने पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कौमार्य परीक्षेवरून मोडलेला संसार आता पुन्हा सावरला आहे.

कौमार्य परीक्षेत विवाहित महिला उत्तीर्ण न झाल्याने तिला दोषी ठरवत पतीने तिला लग्नानंतर दोनच दिवसांत माहेरी पाठवून नांदवण्यास नकार दिला. ही घटना घडली आहे, नासिक जिल्ह्यातील संगमनेर येथे. भारत विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करत आहे. जगाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठीचे जे काही प्रयत्न करता येईल ते भारताकडून करण्यात येत आहे. अशावेळी अजूनही मंदिरात महिलांना प्रवेशासाठी संघर्ष करावा लागत आहे. पंचायतींकडून सहजच विवाह मोडले जातात. त्याला कारण तसे क्षुल्लकच असते. संगमनेर येथील घटनेतील कारणही याच प्रकारात मोडणारे आहे. पण एका छोटय़ाशा कारणामुळे एका मुलीला पुन्हा माहेरी पाठवण्यात आले. तिचा दोष हाच होता की ती लग्नानंतरच्या कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण झाली नाही.

लग्न हा भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. विशिष्ट वय झाल्यानंतर उपवरांचे लग्न लावून देण्यात येते. मुलगी सुस्वरूप हवी, ती कामसू असावी, अशी अनेक मुलांची अपेक्षा असते. त्यातच ती ‘व्हर्जिन’ असावी ही मुख्य अट असते. त्यातूनच मग अशा घटना घडत असतात. मुळात वयात आल्यानंतर कौमार्य परीक्षा वगैरे फॅडचा उदय होत असतो. स्त्रीमधील स्त्री सुलभ अवयव विकसीत झाल्यानंतर ती विवाहयोग्य होते, असे आपल्याकडे मानले जाते. त्यानंतर यथाशक्ती तिचा विवाह योग्य वर पाहून लावून दिला जातो. अनेकदा स्पर्धेच्या युगात स्त्रीयाही पुरूषांसारखेच अंगमेहनतीचे, कसरतीचे कामे करतात. यात त्यांच्यात काही बदल झाल्यास त्यामुळे ती चारित्र्यहीन कशी ठरू शकते? हाच नियम पुरुषांना का लावला जात नाही, याचे कोडे अद्यापही सुटलेले नाही. रूपवान, चारित्र्यसंपन्न स्त्री आपली पत्नी म्हणून पाहिजे, असे म्हणणारे अनेक पुरूष विवाहापूर्वी व्हर्जिन असतात का? हा खरेतर संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण त्याकडे दुर्लक्ष करीत विशिष्ट भागांभोवतीच्या पावित्र्याच्या खुळचट कल्पनांमध्ये आपली मानसिकता अडकली जाते. ही मानसिकता आता बदलायला पाहिजे.

योनीसुचिता या मानसिकतेभोवती समाजमन अजूनही रूंजी घालत असल्यानेच अशा प्रकारच्या घटना घडत असतात. ग्रीक लोककथांमध्ये तरुणीचे कौमार्य भंग पावू नये म्हणून त्या विशिष्ट भागाभोवती संरक्षण जाळी लावली जायची. ही प्रथा तर रानटी स्वरूपाचीच होती. काही समाजात या विशिष्ट अवयवांवर ब्लेड फिरवण्याची अधोरी प्रथा सुरू होती. मध्यंतरी काही महिलांनी त्याविरोधात आवाजही उठवलेला होता. अशा पध्दतीने या रानटी प्रथा, परंपराविरोधात लढण्याची गरज आहे.

जातपंचायत हा प्रत्येक धर्मातील तमोध्याय आहे. या जात पंचायतींच्या साक्षीने हा कौमार्य परीक्षेचा घाट घालण्यात आला होता. एकेकाळी भारतात घटना अस्तित्वात नव्हती तेव्हा समाजात अनाचार माजू नये, यासाठी जात पंचायतीचे नियोजन करण्यात आले होते. पण काळानुरूप या जात पंचायती स्वत:ला श्रेष्ठ मानू लागल्या. त्यांच्याकडून येणारे निर्णयच ग्राह्य धरावे लागतील, अशी मानसिकता बळावू लागली. त्यातूनच मग दुस-या जातीत लग्न करणा-या मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकणे असो, कौमार्य परीक्षा असे प्रकार वाढीस लागलेले आहेत. कुठेतरी हे प्रकार थांबणे गरजेचे आहे. जात पंचायती विरोधातील कायदा राज्य सरकारने केला. पण त्यावर अद्याप राष्ट्रपतींची सही झालेली नाही. ही सही झाल्यानंतर या कायद्याला मूर्त स्वरूप प्राप्त होईल.

काळ ज्या पध्दतीने बदलतो त्याप्रमाणे त्या त्या काळातील रूढी-परंपरा कालबाह्य होत जातात. पण त्याच रुढी,परंपरा यांना कुरवाळत राहिलो तर हाती काहीच येणार नाही. येईल तो मनस्ताप, दु:ख. कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण न झालेली ही महिला शिक्षित आहे. तिने नव-या मुलाचे अगोदर लग्न झालेले असतानाही त्याला स्वीकारले. हा तिचा त्याग बाजूला ठेवत थेट कौमार्य परीक्षेत अनुतीर्ण झाल्यानंतर घरची वाट धरावी लागत असेल तर त्यासारखे दुर्दैव्य ते कोणते? महिला अंतराळाची प्रदक्षिणा करीत आहेत. पुरूषांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या कामे करीत आहेत. गुणवत्ता किंवा कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. अशावेळी योनीसुचितेच्या नावाखाली त्यांना कमी लेखणे हा प्रकारच विकृत मानसिकतेचा आहे. तो थांबलाच पाहिजे. इंदिरा संत यांच्या एका कवितेत ‘शिजणारीही तिच अन् शिजवणारीही तिच’ असं स्त्रीचं वर्णन करण्यात आले आहे. खरोखरच शिजत, शिजवणा-या या ‘बाईमाणसाची’ जाचक अटींतून केव्हा मुक्तता होणार?

No comments: