Monday, December 7, 2015

महिलांना मंदिरात प्रवेशबंदी नसावी.


                  
गेल्या आठवड्यात शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरातील चौथऱ्यावर प्रवेश करून एका तरुणीने शनी महाराजांना तेल वाहिले होते. या     चौथऱ्यावर महिलांना  प्रवेश करण्यास बंदी  असतानाही तरुणीने हे पाऊल उचलल्यामुळे गावात एक दिवस बंद पुकारण्यात आला होता.पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी त्या     तरुणीने दाखवलेल्या धाडसाचे    कौतुक   केले  होते. त्याचवेळी ग्रामस्थांनी या घटनेनंतर मंदिर समितीवर टीकेची झोड उठविली होती.दुसऱ्या दिवशी दुग्धाभिषेक घालून शनी महाराजांच्या चौथऱ्याचे शुद्धिकरण करण्यात आले होते. 

स्त्रियांना मासिक पाळी येते आणि त्यामुळे त्या अपवित्र असतात. अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला    जातो त्याचे हे एक कारण. त्या केवळ  मासिक पाळीच्या काळातच अपवित्र नसतात. तर त्यामुळे एरवीही अपवित्रच असतात. म्हणून त्यांना अनेक ठिकाणी सरसकट प्रवेशबंदी असते.शेकडो  वर्षांची  ही परंपरा आहे. ती मोडता येत  नसल्याने देशातील तसेच    राज्यातील  कित्येक देवस्थानात महिलांना प्रवेशबंदी आहे. 

आज महिलांना समान हक्क आणि आरक्षण असूनही त्यांना समान अधिकार मिळत नाहीत.ज्या महिला याबाबत क्रांती करण्याचा विचार करतात त्यांना काही रूढी जपणाऱ्या महिला वर्गाकडून तसेच देवभोळ्या समाजाकडून डावलण्यात येते,आणि निषेधाचा सूर उमटतो.स्त्रीला मंदीरप्रवेश नाकारायचा यात कोणतं शहाणपण सिध्द करू  इच्छितात ही बुरसटलेली विचारसरणीची माणसं. या गोष्टीतून खरंतर स्त्रीयांनीच काहीतरी शिकायला हवं. अशा देवाधर्माच्या नावावर बळावलेल्या हीन प्रवृत्ती व देवधर्म, मंदीरं यांना झिडकारून अशा प्रथा मोडीत काढल्या पाहीजेत. तरच या  गोष्टींना आळा बसेल.

आजच्या युगात स्त्रिया आकाशाला गवसणी घालताहेत, नवनवीन  संशोधन   करतातहेत, घरच्या जबाबदा-या सांभाळुन सुध्दा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या क्षेत्रात अग्रेसर ठरताहेत. एवढं सारं असतांना विज्ञानयुगात त्याच स्त्रीला मासिक पाळीवरून मंदीरप्रवेश नाकारणं हे दुर्दैवी आहे.

आज उच्च शिक्षित  महिला पोथ्या,पुराणे, पारायणे, व्रत-वैकल्ये यात इतक्या गुरफटलेल्या गेल्या आहेत. शिक्षणाने त्या   साक्षर जरूर  झाल्या, पण सुशिक्षित   झाल्याच असे म्हणता येणार नाही. आधुनिकतेशी नातं सांगणाऱ्या समस्त महिलांनी या घटनेचा निषेध करावा. सगळ्या प्रार्थनास्थळांवर बहिष्कार कायला हवा.मंदिर,मशिदी,दर्गे जिथे जिथे स्त्रियांना प्रवेशबंदी,दर्शनबंदी आहे, तिथला प्रवेश स्त्रीयांनीच झिडकारायला हवा ! स्त्रियांच्या शोषणाची मूळं अशा धर्मस्थळातच लपलेली आहेत. ती तिथून आता उखडायला हवीत.

 पौरोहित्य करण्यासाठी महिला चालते, तर    ती देवीच्या  गाभाऱ्यात का जाऊ शकत नाही? स्त्रीच्या मासिक पाळीचे कारण देत सात्विकतेचा मुद्दा उगाळणाऱ्या पुरुषी डोळ्यांना श्रीपूजकांच्या तथाकथित   सात्विकतेचा मुखवटा का  सत नाही? दुसऱ्यावर श्रेष्ठत्वाचा अधिकार गाजवण्याची जी प्रवृत्ती माणसात असते त्याचाच आविष्कार अशा तऱ्हेच्या बंदीत स्पष्टपणे दिसतो.स्त्री व पुरुष असा  भेदभाव करणं घटनेतील समानतेच्या  तत्त्वाविरुद्ध आहे. नव्या आणि बदलत्या  वातावरणात तसंच भारतीय घटनेनेही समानतेचे तत्त्व    मान्य केले असल्याने स्त्रिया आणि पुरुष यांच्यात असा भेदभाव करणे योग्य नाही. स्त्रियांना दूर ठेवण्याची मानसिकता आहे ती पुरुष हा अधिक पवित्र आहे या समजुतीतून आली आहे.  अशा समाजाच्या मानसिकतेचीच मशागत गरजेची आहे. 

 

‘जिथे जिथे पुरुष प्रवेश  करू शकतो, तिथे तिथे   कायद्याने आणि नैतिकदृष्ट्या स्त्रीही प्रवेश करू शकलीच पाहिजे’.

No comments: